छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू असून संजय केणेकर आणि कैलास गोरंट्याल यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केणेकर यांना आधी ११ महिन्यांचा कालावधी मिळाल्याने त्यांना संधी द्यायची की जालना महापालिका एकहाती खेचून आणणाऱ्या कैलास गोरंट्याल यांना संधी द्यायची, यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपकडून आमदार संजय केणेकर, सिल्लोडचे सुरेश बनकर, जालन्याचे कैलास गोरंट्याल यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यापैकी कुणाला संधी मिळते की पक्ष पुन्हा धक्कातंत्र वापरेल, याची जोरदार चर्चा आहे. विद्यमान आमदार केणेकर यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागेसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. केणेकर यांना मुळातच आमदारकीचा पूर्ण कालावधी न मिळाल्याने एक पूर्ण टर्म मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार
त्यांनी फिल्डिंगही लावली आहे. मात्र, यावेळी जालन्यातूनही प्रबळ नाव समोर आले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यावर जालन्याची महापालिका पहिल्यांदाच भाजपच्या खिशात टाकण्याची कामगिरी केलेले कैलास गोरंट्याल यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक ही गोरंट्याल यांची जमेची बाजू आहे. याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढलेले, थोड्या फरकाने पराभूत झालेले, लगेचच भाजपमध्ये परतलेले सुरेश बनकर यांचेही नाव चर्चेत आहे.
१२ मे रोजी मतदान
विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. अशा एकूण १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होईल. भाजप सहा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
राजकीय खेळी?
महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी संजय केणेकर यांच्या पुत्राने अर्ज दाखल केला होता, मात्र नंतर माघार घेतली. यामागे विधान परिषदेसाठी आमदारकी मिळवायची राजकीय खेळी तर नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पण खरी चुरस केणेकर आणि गोरंट्याल यांच्यात असल्याचे भाजप नेते सांगतात. असे असले तरी ऐनवेळी धक्का देण्याचा भाजपचा अनुभव पाहता एखादे नवीनच नाव समोर येऊ शकते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












